लखनौ - महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सध्या हनुमान चालिसा, राम मंदिर असे मुद्दे गाजत आहेत. दरम्यान, अयोध्या दौऱ्याची घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेनेही आदित्य ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. मात्र राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध झाल्यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यालाही विरोध होऊ लागला आहे.
भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी उत्तर भारतीयांना झालेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. तसेच अयोध्येत येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी अट घातली आहे. दरम्यान, राज ठाकरेंनंतर आता युवासेनाप्रमुख आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यालाही विरोध सुरू झाला आहे.
महाराणा प्रतापसेनेने आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. महाराणा प्रताप सेनेचे संस्थापक राजवर्धन सिंह यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात भूमिका घेतली आहे.आदित्य ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत राजवर्धन सिंह म्हणाले की, आदित्य ठाकरे हे जर अयोध्येत येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. त्यांच्या आजोबांनी राम मंदिराच्या आंदोलनात योगदान दिले आहे. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं मानसिक संतुलन सोनियाभिमुख झालं आहे. त्यामुळे अशा लोकांना महाराणा प्रताप सेना अयोध्येत पाठवण्याचं काम करेल, असे राज्यवर्धन सिंह म्हणाले.