लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बारसू रिफायनरी प्रकल्पाचा विरोध आता कोकणात पसरला असून, तो राज्यव्यापी होत असल्याचे बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांना दिल्लीत भेटून सांगितले. या सर्व मुद्द्यांची आणि ग्रामस्थांच्या संघर्षाची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचे पुरी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यासोबत संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, वैभव कोळवणकर, नरेंद्र जोशी, कमलाकर गुरव, दीपक जोशी, शंकर जोशी, सत्यजित चव्हाण आणि नितीन जठार यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने हरदीपसिंह पुरी यांच्या संसदेतील कार्यालयात भेट घेतली.बारसू ते देवाचे गोठणेच्या सड्यावर असलेल्या दहा हजार वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांचे महत्त्व, आंबोळगड-राजवाडी किनाऱ्याची जैवविविधता आणि सीआरझेड वर्गवारीबाबतची माहिती पेट्रोलियम मंत्र्यांना देण्यात आली. पंचक्रोशीतील ९५ टक्क्यांहून अधिक स्थानिक ग्रामस्थ आणि कोकणवासी बारसू पंचक्रोशीत हा प्रकल्प होऊ देणार नाहीत, असे संघटनेने स्पष्ट केले.
पुरी यांना भेटण्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत तसेच ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यासोबत संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली.