नवी दिल्ली: येत्या 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदानानंतर, त्याच दिवशी राजधानी दिल्लीत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विरोधी नेते निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेतील आणि त्याचे मूल्यांकन करतील. तसेच 4 जून रोजी येणारे निकाल लक्षात घेऊन भविष्यातील राजकीय रणनीतीवर चर्चा होईल.
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार, विरोधकांचा दावाइंडिया आघाडीतील प्रमुख नेते या बैठकीला हसभागी होणार आहेत, त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. शिवाय, भाजपला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी जागा मिळणार असल्याचेही अनेक राजकीय तज्ञांचे मत आहे. तर, इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल, असा दावा विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे भविष्यातील रणनीतीवर विचार करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे.
तृणमूल काँग्रेस सहभागी होणार नाहीकाँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वतीने मित्रपक्षांच्या नेत्यांना या बैठकीसाठी संदेश पाठवण्यात आला आहे. दरम्यान, 1 जून रोजी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक असल्यामुळे ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस या बैठकीत सहभागी होणार नाही. तिथे सातव्या आणि अंतिम टप्प्यात लोकसभेच्या नऊ जागांवर मतदान होणार आहे, ज्यामध्ये कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर या कोलकातामधील दोन जागांचाही समावेश आहे.
बैठकीला हे नेते उपस्थित राहणार तृणमूल काँग्रेसने इंडिया आघाडीसोबत जागांचा करार केला नाही, परंतु ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्या इंडिया आघाडीचा एक भाग आहेत आणि विरोधी पक्षाचे सरकार स्थापन झाले, तर तृणमूल काँग्रेस त्याचा एक भाग असेल. दिल्लीत होणाऱ्या बैठकीला शरद पवार, सीताराम येचुरी, डी राजा यांच्यापासून ते द्रमुक, झामुमो, नॅशनल कॉन्फरन्स, आरजेडी, सपा आणि विरोधी आघाडीत समाविष्ट असलेल्या इतर पक्षांचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.