नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपा नेत्यांनी 'संपर्क फॉर समर्थन'च्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधील दिग्गजांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या. एकीकडे भाजपा नेत्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असताना, दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपाविरोधात एकत्र येताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीसाठी राहुल गांधींनी पुढाकार घेतला होता. राहुल यांच्या भेटीसाठी शरद पवार फक्त एका दिवसासाठी दिल्लीला गेले होते. राहुल यांनी पवारांच्या जनपथवरील सरकारी निवासस्थानावर त्यांची भेट घेतली. यावेळी दोन नेत्यांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली. आगामी लोकसभा निववडणुकीतील विरोधकांच्या रणनितीबद्दल या भेटीत चर्चा झाली. यूपीए सरकारच्या काळात कृषिमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी राहुल गांधींना काही विशेष सूचना केल्या. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आक्रमक होऊन प्रचार करण्याचा सल्ला यावेळी पवारांकडून राहुल यांना देण्यात आला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा, असं शरद पवारांनी राहुल यांना सांगितलं. 'या तीन राज्यांमध्ये भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यात काँग्रेसला यश आल्यास त्याचा मोठा फायदा विरोधी पक्षांना लोकसभा निवडणुकीत होईल. याशिवाय या विजयामुळे काँग्रेसचंही राजकीय वजन वाढेल,' असं पवारांनी राहुल गांधी यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्नाटक आणि गुजरात प्रमाणेच तिन्ही राज्यांमध्ये आक्रमक होऊन प्रचार करा, असं पवार म्हणाले. या तिन्ही राज्यातील निवडणूक निकालाचा परिणाम 2019 मधील लोकसभा निवडणुकीला पाहायला मिळेल, असं पवारांनी राहुल यांना सांगितलं.
राजस्थान, मध्यप्रदेशातील निवडणुकीत आक्रमक व्हा, पवारांचा राहुल गांधींना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 1:28 PM