गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 06:37 AM2024-12-12T06:37:40+5:302024-12-12T06:38:12+5:30
कामकाज नीट पार पाडण्यासाठी गांधीगिरी; ‘देश विकू नका’चा दिला संदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज नीट पार पडावे यासाठी सहकार्य करा, असे आवाहन करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी एका हातात तिरंगा ध्वज व दुसऱ्या हातात गुलाबपुष्प घेऊन भाजपच्या खासदारांचे स्वागत केले. अदानी प्रकरणासह सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा व्हायला हवी, अशीही मागणी विरोधकांनी केली.
विरोधी पक्षाचे नेते पायऱ्यांसमोर उभे होते, बहुतेकांनी लहान तिरंगा कार्ड आणि लाल गुलाब घेतले होते. देश विकू नका अशा घोषणांचे फलक काही खासदारांनी हाती घेतले होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद भवनात प्रवेश करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना तिरंगा राष्ट्रध्वज दिला. काँग्रेस सरचिटणीस व खासदार प्रियांका गांधी, काँग्रेस, द्रमुक, झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) व डाव्या पक्षांचे खासदार हे संसद भवनाच्या, मकरद्वार येथील पायऱ्यांसमोर उभे होते व त्यांच्यापैकी बहुतेकांनी हाती तिरंगा राष्ट्रध्वज व लाल गुलाब घेतले होते.
संसद चालावी
ही आमची इच्छा
संसदेचे कामकाज चालावे ही आमची इच्छा आहे. मात्र, केंद्र सरकारची अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची इच्छा नसल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकावे यासाठी गांधींनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओब बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गांधींनी सरकारवर टीका केली.