लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :संसदेतीलअर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्या, सोमवारपासून सुरू होत असून वित्त विधेयक संमत करण्यास आमचे प्राधान्य असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे; तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर होत असलेली कारवाई व अदानी उद्योगसमूहाबद्दल झालेले आरोप या दोन मुद्द्यांवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित काळात केंद्र सरकारला पुन्हा कोंडीत पकडण्याचा निर्धार विरोधकांनी केला आहे.
केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखण्याकरिता विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात उद्या, सोमवारी सकाळी होणार आहे. हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी उद्योगसमूहाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याची केंद्र सरकारने उत्तरे द्यावी, अशी मागणी काँग्रेस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातही लावून धरणार आहे, असे त्या पक्षाचे नेते के. सुरेश यांनी सांगितले. अदानी उद्योगसमूहावरील आरोपांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने संयुक्त संसदीय समिती नेमावी, या मागणीचाही काँग्रेसने पुनरुच्चार केला आहे.
‘विरोधी पक्षांच्या नेत्यांवरील कारवाईचा निषेध’
विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संबंधित ठिकाणांवर सीबीआय, ईडीने गेल्या काही दिवसांत धाडी घातल्या. त्यातील काही नेत्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले. या कारवाईचा विरोधकांनी निषेध केला आहे. विरोधकांवरील कारवाईबाबतच्या प्रश्नांचा पाठपुरावा विरोधक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात करणार आहेत. गेल्या ३१ जानेवारीला सुरू झालेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ एप्रिलपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"