नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपाचा चौखूर उधळलेला वारु रोखण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपाचा अश्वमेध थोपवण्यासाठी काँग्रेसचं नेतृत्त्व आणि वरिष्ठ नेत्यांकडून रणनिती आखली जात आहे. भाजपा फिर एक बार मोदी सरकारसाठी कामाला लागली असताना काँग्रेसनं मात्र निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जाहीर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचं उमेदवार जाहीर करण्यात यावं, अशी मागणी अनेकदा पक्षातून करण्यात आली आहे. याशिवाय अनेक विरोध पक्षांनीदेखील ही मागणी केली आहे. जम्मू काश्मीरमधील प्रमुख पक्ष असलेल्या ओमर अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावं, अशी मागणी केली होती. राहुल गांधींनी काँग्रेस आघाडीचं नेतृत्त्व करावं, असं अब्दुल्ला म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीसोबतच येत्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठीही काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करणार नाही. लवकरच छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी कोणत्याही राज्यात काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. पक्षांतर्गत लाथाळ्या टाळण्यासाठी पक्षानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.