मिशन 2024 साठी विरोधकांचे 'अब तक 26', बेंगळुरूतील बैठकीसाठी काँग्रेसचे आणखी दोन पक्षांना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 02:59 AM2023-07-16T02:59:44+5:302023-07-16T03:03:05+5:30
काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अपना दल (कमेरावादी) आणि तामिळनाडूतील एका प्रादेशिक पक्षाला हे निमंत्रण पाठविले आहे.
पुढील वर्षात, अर्थात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या विरोधी पक्षांची पुढची बैठक 17 आणि 18 जुलै रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे. तत्पूर्वी, काँग्रेसने आणखी दोन छोट्या पक्षांना या बैठकीत सहभागी होण्यासंदर्भात निमंत्रण पाठविले आहेत. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अपना दल (कमेरावादी) आणि तामिळनाडूतील एका प्रादेशिक पक्षाला हे निमंत्रण पाठविले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपना दल (के)च्या प्रमुख कृष्णा पटेलही विरोधकांच्या बैठकीत सहभागी होऊ शकतात. याच बरोबर, बेंगळुरूत होणाऱ्या या बैठकिसाठी निमंत्रित पक्षांची संख्या आता 26 वर पोहोचली आहे. यापूर्वी 23 जून रोजी बिहारच्या पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक झाली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आवाहनावरून ही बैठक झाली होती.
पहिल्या बैठकीत 30 हून अधिक नेते सहभागी झाले होते -
या बैठकीसाठी एकूण 16 पक्षांना आमंत्रित करण्यात आले होते. यांपैकी 15 पक्षांनी या बैठकीला हजेरी लावली. कौटुंबिक कार्यक्रमामुळे आरएलडीचे जयंत चौधरी बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. या पक्षांच्या 30 हून अधिक नेत्यांनी निवडणुकांबाबत समान रणनीतीसंदर्भात चर्चा केली होती.
दुसरी बैठक काँग्रेसच्या नेतृत्वात -
काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची दुसरी बैठक होत आहे. ही बैठक आधी शिमल्यात होणार होती, मात्र खराब हवामानामुळे जागा बदलण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 17 जुलै रोजी बेंगळुरूमध्ये विरोधी पक्षांसाठी डिनरचे आयोजन केले आहे. तर 18 जुलैला बैठक होईल. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीही या बैठकीत सहभागी होणार आहेत. या शिवाय ममता बॅनर्जीहीया बैठकीत सहभागी होतील.