कोलकाताः दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं खराब कामगिरीचं प्रदर्शन केल्यानंतर काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 'नेत्यांचा अभिमान आणि महत्वाकांक्षा संपवणं ही काळाची मागणी आहे, असं राज्यसभेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम म्हणाले. काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी युवा नेत्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. तसेच त्यांच्या वाटेत काटे न पेरता त्यांचा सल्ला विचारात घेतला पाहिजे. विरोधी पक्षांनी CAA-NRCच्या विरोधात प्रदर्शन करण्यापासून दोन हात लांबच राहिलं पाहिजे. जनतेच्या आंदोलनांना हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नये. कोणाच्या एकाच्या हातात जादू नाही, यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. एकत्रित कार्य, सामूहिक शिस्त आणि प्रत्येक व्यक्तीनं अहंकार बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचं हे आव्हान असेल. देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या भविष्याबद्दल जयराम रमेश यांना विचारलं असता ते म्हणाले, आपल्या सर्वांची स्वतःची अशी एक महत्त्वाकांक्षा असते, परंतु पक्षाला पुन्हा उभे करणं आवश्यक आहे. तसेच सत्तेवर परत येणंसुद्धा गरजेचं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसर्यांदा एकही जागा न आणल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला आणि नेते एकमेकांवर आरोप करू लागले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या नेत्यांना मार्गदर्शन करावे, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसमधील दिग्गजांना दिला आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही केवळ केंद्रातच नव्हे तर राज्यांतही सत्ता गमावली. तथापि आम्ही परत काही ठिकाणी सत्तेवर आलो. आपल्याकडे अजून जाण्यासाठी खूप पल्ला बाकी आहे. अर्थात बोगद्याच्या शेवटी प्रकाश दिसतोय, पण बोगदा खूप लांब आहे. तो प्रकाश पाहण्यासाठी आपल्याला अजून खूप पुढे जावं लागणार आहे. आपले पुस्तक 'अ चेकर्ड ब्रिलियन्स: द मॅनी लिव्ह्स ऑफ व्ही.के. कृष्णा मेनन' या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या बोलण्याविषयी फार सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण भाजपा नेहमीच ध्रुवीकरण करण्याचं आणि जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न करते."सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर)च्या विरोधात होत असलेल्या वारंवार निदर्शनांचा संदर्भ देताना ते म्हणाले की, या विषयाचे राजकारण केले जाऊ नये. या जनआंदोलनांपासून आपण आपले अंतर राखून ठेवले पाहिजे. आपण त्यांचे राजकारण करण्याचा किंवा त्यांचा मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करू नये. काही गोष्टी राजकीय पक्ष करू शकत नाहीत. ते जनआंदोलनाच्या माध्यमातूनच सुटत असतात
CAA-NRCच्या विरोधात विरोधकांनी प्रदर्शन करू नये, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 4:58 PM
काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी युवा नेत्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. तसेच त्यांच्या वाटेत काटे न पेरता त्यांचा सल्ला विचारात घेतला पाहिजे.
ठळक मुद्देआता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 'नेत्यांचा अभिमान आणि महत्वाकांक्षा संपवणं ही काळाची मागणी आहे, असं राज्यसभेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश म्हणाले. काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी युवा नेत्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. तसेच त्यांच्या वाटेत काटे न पेरता त्यांचा सल्ला विचारात घेतला पाहिजे.