ऑनलाइन लोकमत -
गुंटूर (आंध्रप्रदेश), दि. 22 - हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलाच्या जातीवरुन पुन्हा नव्याने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रोहित वेमुलाच्या जातीवरुन गोंधळ तसंच असमंजसपणा असल्याने नव्याने चौकशीची गरज असल्याचं गुंटूर जिल्हाधिकारी कांतीलाल दांडे यांनी सांगितलं आहे. कांतीलाल दांडे यांच्या कार्यालयाने रोहित वेमुला दलित असल्याचं याअगोदर सांगितलं आहे. हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठात पीएचडी करणा-या रोहितने १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती.
'रोहित वेमुलाची जात नेमकी काय होती हे जाणून घेण्यासाठी नव्याने चौकशीची गरज आहे. याअगोदर आलेल्या दोन अहवालांमध्ये वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे. गुंटूर आणि गुरजालामधील महसूल अधिका-यांनी यासंबंधी अहवाल दिला होता. एका अहवालात रोहित वेमुला दलित, तर दुस-या अहवालात मागासवर्गीय होता असं नमूद करण्यात आलं आहे', अशी माहिती कांतीलाल दांडे यांनी दिली आहे.
रोहितचा जन्म गुंटूरमध्ये झाला होता. तर त्याचे वडील गुरजालामधून आहेत. पहिला अहवाल ज्यामध्ये रोहित वेमुला दलित असल्याचं नमूद करण्यात आलं होतं फक्त तोच अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे पाठवण्यात आला होता.
रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय आणि हैद्राबाद विद्यापीठाचे कुलगुरु आप्पा राव यांच्यावर दलित कार्यकर्त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी केली आहे. यामुळे रोहित वेमुलाची जात नेमकी काय होती हे जाणून घेणं महत्वाचं झालं आहे. बंडारु दत्तात्रेय आणि आप्पा राव यांच्यापैकी कोणाचीच पोलिसांनी अजूनपर्यंत चौकशी केलेली नाही. गुंटूर जिल्हाधिका-यांनी रोहित वेमुलाच्या जातीसंबंधी योग्य माहिती किंवा जात प्रमाणपत्र दिलं नसल्याने कारवाई केली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
'दोन्ही महसूल अधिका-यांच्या अहवालात गफलत आहे. त्यामुळे आमच्याकडूनच पाठण्यात आलेल्या अहवालावर पुन्हा पाहणी करण्याची गरज असल्याचं', कांतीलाल दांडे यांनी सांगितलं आहे.