चंदिगढ: एखाद्या खडतर परिस्थितीला तोंड द्यायचे झाल्यास भारतीय वायूदल हे चीनपेक्षा अधिक सक्षम आणि सुसज्ज आहे, असे विधान भारतीय वायूदलाचे प्रमुख बी.ए. धानोआ यांनी केले. ते शुक्रवारी हलवारा येथील वायूदलाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय वायूदल कोणत्याही आव्हानाचा सामना करायला तयार असल्याचे सांगितले. गेल्यावर्षीही त्यांनी भारतीय वायूसेना अगदी कमी वेळात युद्धाच्यादृष्टीने सज्ज होऊ शकते, असा दावा केला होता.
दरम्यान, चीनकडूनही नुकताच पाकिस्तानशी एक सामरिक करार करण्यात आला. त्यानुसार चीनकडून पाकिस्तानला मिसाईट ट्रॅकिंग सिस्टिमची विक्री करण्यात आली. भारताने गुरुवारी केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर ही बाब उघडकीस आली. या करारामुळे पाकिस्तानला आपला बहुआयामी अण्वस्त्रवाहून क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचा कार्यक्रम पुढे रेटता येणार आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार पाकिस्तान आणि चीनमध्ये झालेल्या या कराराच्या रकमेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानी सैन्याने या सिस्टिमचा वापर आपल्या एका फायरिंग रेंजजवळ करण्यास सुरुवात केली आहे.