मुंबई : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३० जानेवारीला एकाचवेळी देशभरात २ हजार ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सायंकाळी ५.१७ वाजता सर्व ठिकाणी दोन मिनिटे मौन पाळून अहिंसा आणि सद्भावनेचा संदेश दिला जाणार आहे. मुंबईतही मणी भवन येथे गांधीजींच्या स्मृतींना उजाळा देऊन आॅगस्ट क्रांती मैदान येथे विशेष कार्यक्रम पार पडणार आहे.अभिवादन कार्यक्रमासाठी विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था व संघटना, कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांत अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास म्हणाल्या की, महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे निमित्त साधत ३० जानेवारीला असलेल्या पुण्यतिथीनिमित्त अहिंसा व सद्भावनेचा संदेश देण्यात येणार आहे. या मोहिमेत सामाजिक संस्थांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, आम आदमी पार्टी अशा विविध राजकीय पक्षांनीही सामील होण्यास पाठिंबा दिला आहे.या अभिवादनपर कार्यक्रमात सकाळी ११ वाजता मुंबईतील विविध शाळा, महाविद्यालये, सामुदायिक केंद्रांच्या ठिकाणी दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली जाईल. भारतीय विद्या भवन, अंजुमन-ए-इस्लाम, जय हिंद महाविद्यालय, सिडनेम महाविद्यालय, अकबर पीरभॉय, भवन्स महाविद्यालय, हाजी अली दरगाह अशा विविध ठिकाणीही कार्यक्रम पार पडतील. दुपारी ३ वाजता सर्व संस्था व संघटना मणी भवन येथे एकवटतील. येथून नाना चौकमार्गे सर्व नागरिक आॅगस्ट क्रांती मैदानापर्यंत मूक रॅली काढतील.सायंकाळी ४.३० वाजता आॅगस्ट क्रांती मैदानात पोहोचल्यानंतर गांधीजींच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या गीत आणि भजनांचे गायन केले जाईल. तसेच शांती, सद्भाव आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची शपथ नागरिक घेतील. सायंकाळी ५.१७ वाजता दोन मिनिटांचे मौन बाळगून गांधीजींना श्रद्धांजली वाहिली जाईल.
महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात २ हजार ठिकाणी कार्यक्रम होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 4:17 AM