सूरत : हिरे आणि वस्त्राेद्याेग ही सुरतची जुनी ओळख आहे. मात्र, आता या शहराची अवयवदानासाठीही नवी ओळख निर्माण हाेऊ लागली आहे. सलग ४० व्या दिवशी सुरतमध्ये अवयवदान करण्यात आले आहे. एका ब्रेनडेड व्यक्तीचे हृदय १६०० किलाेमीटर अंतरावर असलेल्या चेन्नईमध्ये दान करण्यात आले. केवळ २२१ मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण झाला.
ओडिशा येथील मूळ रहिवासी सुशील साहू हे एका वस्त्रनिर्मिती कारखान्यात काम करत हाेते. २६ जानेवारीला अचानक त्यांचा रक्तदाब वाढला आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ सुरतच्या बेंकेर्स रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घाेषित केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अवयवदानास प्राेत्साहन देणाऱ्या ‘डाेनेट लाईफ’ या संस्थेने त्यांच्या कुटुंबीयांशी रुग्णालयात संपर्क केला. कुटुंबीयांनी सहमती देऊन अवयवदानास मंजुरी दिली. चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात ४७ वर्षीय रुग्णाला त्यांचे हृदय ट्रान्सप्लांट करण्यात आले. त्यासाठी ग्रीन काॅरिडाेर बनविण्यात आला हाेता.
सहा जणांना जीवदानसाहू यांच्या दाेन्ही किडनी अहमदाबादमध्ये दाेन रुग्णांना देण्यात आल्या तसेच यकृतही भावनगरच्या एका रुग्णाला देण्यात आले तसेच दाेन्ही डाेळे सुरतच्या चक्षू बॅंकेत दान करण्यात आले आहे. फुप्फुसाचे ट्रान्सप्लांट मुंबईत हाेणार हाेते. मात्र, संबंधित रुग्णाला काेराेना झाल्यामुळे ते शक्य झाले नाही.