नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एका उच्चस्तरीय बैठकीला संबोधित केलं. यावेळी त्यांनीदहशतवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, दहशतवादाशी संबंधित आव्हान आणि नुकसानीमुळे भारतावर खोलवर परिणाम झालाय. दहशतवादाला कोणत्याही धर्म, राष्ट्रीयत्व, सभ्यता किंवा वांशिक गटाशी जोडू नये, असे आमचे स्पष्ट मत आहे.
जयशंकर पुढे म्हणाले की, असे काही देश आहेत जे दहशतवादाशी लढण्याचा आमचा संकल्प कमकुवत करत आहेत. पण, ही कारस्थाने खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीनला नाव न घेता दिला. याशिवाय, आयसीसचे आर्थिक स्त्रोत मजबूत झाले असून, आता हत्येसाठी किंवा दहशतवादी कारवायांसाठी बिटकॉइनमधून पैसे दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अफगाणिस्तानवर भाष्यएस जयशंकर यांनी तालिबानच्या अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर पहिल्यांदाच दहशतवादाबद्दल भारताच्या चिंतेवर मत व्यक्त केलं. अफगाणिस्तानात असो किंवा भारताविरोधात, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संगटना न घाबरता कारवाया करत आहेत, असंही ते म्हणाले.