नवी दिल्ली : कोरोना संकटाशी सामना करीत असतानाच देशातील काही राज्यांत मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे आठ राज्यांत पावसाने घातलेले थैमान तसेच भूस्खलनामुळे आतापर्यंत ४७० जणांचा बळी गेला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वात जास्त फटका पश्चिम बंगाल, गुजरात व आसाम या राज्यांना बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील काही राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तेथील काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पुराच्या पाण्याने हाहाकार माजविला आहे. या नैसर्गिक संकटापासून लोकांचा बचाव करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ)ची पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. त्यांनी तिथे मदतकार्यास सुरुवातही केली. एनडीआरएफची ७० हून अधिक पथके देशातील विविध भागांत मदतीसाठी पाठविण्यात आली आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी पावसाळ्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या राज्यात सुमारे १४२ लोकांचा मुसळधार पावसाने बळी घेतला, तसेच काही लोक बेपत्ता आहेत. पावसामुळे आसाममध्ये १११ जणांचा, तर गुजरातमध्ये ८१ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ४६, तर उत्तर प्रदेशमध्ये ४४ लोकांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या वर्षीही मुसळधार पावसामुळे देशातील काही भागात मोठे नुकसान झाले होते. एनडीआरएफचे पूरग्रस्त आसाम आणि बिहारमध्ये मदत आणि बचाव चालू आहे. तथापि, हे काम दीर्घकाळ चालेल.
२५ लाख लोकांना फटका
आसाममधील २४ जिल्ह्यांमध्ये २५ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्यात गोलपाडा येथील साडेचार लाख लोकांचा समावेश आहे.
बारपेटामध्ये ३.४४ लाख, तर मोरीगाव येथे ३.४१ लाखांहून अधिक लोकांना पावसाचा फटका बसला आहे. मुसळधार पाऊस व पूर यामुळे आसाममधील काझीरंगा अभयारण्यातील प्राण्यांच्या जिवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. तिथे आतापर्यंत १०८ प्राण्यांचा मृत्यू झाला.
आसाममधील पूरस्थितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडून दूरध्वनीवरून माहिती घेतली व त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.
346 कोटी आसामला
पुराने थैमान घातलेल्या आसामला केंद्र सरकारने पूर व्यवस्थापन कार्यक्रमातहत लवकरच ३४६ कोटी रुपयांच्या मदतीचा पहिला हप्ता देण्याची घोषणा केली. आसाममध्ये आतापर्यंत पडझड आणि पुराच्या तडाख्याने ११५ लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील ८ जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा बसला साडेतेरा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.