नवी दिल्ली : माजी सैनिकांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीतील पार्टी मुख्यालयात भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी माजी सैनिकांशी वन रँक वन पेन्शन आणि राफेल डीलसह अनेक विषयावर चर्चा केली. तसेच, राफेल डील आणि वन रँक वन पेन्शनवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेलची प्रक्रिया बदलली. तसेच, सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन लागू केली नाही, असे राहुल गांधी म्हणाले. याचबरोबर, केंद्र सरकारने राफेलच्या एका विमानासाठी 1600 कोटी रुपये दिले, त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. सरकारने सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्याप वन रँक वन पेन्शन लागू केली नाही. आमचे सरकार येईल, तेव्हा सैनिकांसाठी पेन्शन योजना लागू केली जाईल, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. याची किंमत आपल्या जवानांना भोगावी लागत आहे. त्यातच राफेल घोटाळाही समोर आला आहे. अनिल अंबानी यांना सरकार 30 हजार कोटी रुपये देऊ शकते. मात्र, माजी सैनिकांसाठी सरकारकडे 19 हजार कोटी रुपये द्यायला नाहीत, असेही राहुल गांधी यांनी सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला.