लखनऊ- ताजमहाल भारतीयांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे, असं विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं असतानाच आता शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनीही एक वक्तव्य केलं आहे. ताजमहाल हे प्रेमाचं प्रतीक होऊ शकतं. परंतु पूजेचं ठिकाण नाही. एखाद दुसरा सोडल्यास जास्त करून मुगल हे अय्याश होते, मुस्लिम त्यांना आदर्श समजत नव्हते, असं शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी म्हणाले होते.तसेच अयोध्येत राम मंदिर पुनर्निर्माणाला विरोध करणं हे दुःखद आहे. राम मंदिर उभारणं हे चांगलं काम आहे. कारण अयोध्या हे हिंदूंच्या वारशाचं केंद्र आहे. मायावती ज्यावेळी स्वतःचा पुतळा बनवत होत्या, त्यावेळी कोणीही विरोध केला नव्हता. परंतु राम मंदिर निर्माणाला एवढा विरोध का होतोय, हे मला समजत नाहीये. सरकारला अयोध्येत भगवान रामाची मूर्ती उभारायची असेल तर आम्ही नक्कीच जमीन देऊ, असंही वसीम रिझवी म्हणाले आहेत. योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून रामाच्या मूर्तीच्या निर्माणासाठी 10 चांदीचे बाणही देणार आहेत.
भाजपा आमदार संगीत सोम यांच्या विधानानंतर सुरू झालेल्या ताजमहालच्या वादावर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली होती. ताजमहाल कोणी बांधला ? कशासाठी बांधला ? हे महत्वाचे नाही. ताजमहाल भारतीय मजुरांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे. त्यामुळे ताजमहाल नि:संशय भारतीयच आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.ताजमहाल भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत नाही. 'ताजमहाल बांधणा-यांनी उत्तर प्रदेश व भारतातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं. ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील डाग आहे, असे संगीत सोम म्हणाले होते. योगी आदित्यनाथ यांनी घेतलेली भूमिका एक प्रकारे संगीत सोम यांच्यासाठी चपराक होती. योगी 26 ऑक्टोबरला आग्र्याचा दौरा करू शकतात. त्यावेळी ते ताजमहाल आणि अन्य स्थळांना भेट देतील. आग्र्याशी संबंधित 175 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती राज्यांच्या पर्यटन विभागाशी संबंधित असलेल्या अवनिश अवस्थी यांनी दिली होती. ताजमहाल एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. इथे येणा-या पर्यटकांना दर्जेदार सेवा देण्याची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारची आहे. त्यासाठी आम्ही 370 कोटींची योजना आखली आहे.