लखनौ - उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील एका डॉक्टरने आरोप केला की, त्याच्या नावाखाली भलत्याच व्यक्तीने रुग्णावर शस्त्रक्रिया केली. आपल्याला ही बाब समजलीच नाही. डॉक्टरांच्या तक्रारीनंतर आता मेरठ येथील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक पथक तयार करून तपास करण्यास सुरुवात केली आहे.
मेरठमधील एक युरो सर्जन डॉक्रप सरत चंद्रा यांनी सांगितले की, त्यांच्याकडे रक्तस्रावाची तक्रार घेऊन एक रुग्ण आला. तेव्हा त्याच्यावरील उपचारांची कागदपत्रे पाहून त्यांना धक्का बसला. कारण त्या कागदांवर संबंधित डॉक्टर म्हणून त्यांच्याच नावाचा उल्लेख करण्यात आला होता. ते पाहून त्यांना धक्का बसला. कारण त्यांनी त्या रुग्णावर शस्त्रक्रियाच केली नव्हती.
हे संपूर्ण प्रकरण गड रोड येथील गोकुलपूरमधील एका प्रायव्हेट रुग्णालयातील रुग्णावर झालेल्या शस्त्रक्रियेचे आहे. देवेंद्र नावाच्या रुग्णाला या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. ते लघवीशी संबंधित समस्येने त्रस्त होते. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिसा करण्यात आली,. रुग्णाला रुग्णालयात उपचार झाल्यानंतर जे कागद देण्यात आले त्यात डॉक्टर सरत चंद्रा यांचं नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर देण्यात आला.
शस्त्रक्रियेनंतर एक दिवस अचानक रुग्णाची प्रकृती बिघडली. त्यानंतर नातेवाईक डिस्चार्ज स्लिप आणि रुग्णाला घेऊन मेरठमधील या रुग्णालयात पोहोचले. डिस्चार्ज स्लिपवर डॉक्टर सरत चंद्रा यांचं नाव असल्याने रुग्णाला त्यांच्याकडे पाठवण्यात आले. मात्र सरत चंद्रा यांना हे पाहून धक्का बसला. कारण त्यांनी रुग्णावर शस्त्रक्रिया केली नव्हती. तर त्यांच्या नावाखाली भलत्याच कुणीतरी शस्त्रक्रिया केली होती. आता याबाबतची तक्रार प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.