नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या ‘बीफ’ वांशिक वादाचे विश्लेषण करताना मुडीज अॅनलिटिक्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजप सदस्यांना आवर घालण्याचा खबरदारीचा इशारा दिला आहे. भाजप नेत्यांची बेलगाम विधाने पाहता ते देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरील विश्वासार्हता गमावून बसतील, असेही मुडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे.भाजपकडे राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे महत्त्वपूर्ण सुधारणा विधेयके पारित झाली नाहीत. विरोधकांकडून खोळंबा घातला जात आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी अलीकडे केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे सरकारच्या अडचणीत भरच पडली आहे. भाजप नेत्यांनी चालविलेल्या कथित ‘राष्ट्रवादी’ विधानांपासून मोदींनी स्वत:ला दूर ठेवले असले तरी विविध अल्पसंख्य समुदायांना उन्मादकपणे चिथावणी दिली जात असल्यामुळे जातीय तणाव निर्माण झाला आहे. हिंसाचार वाढल्यामुळे सरकारला राज्यसभेत विरोधकांकडून जोरदार हल्ल्याला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे आर्थिक धोरणांवरील चर्चा बाजूला सारली जाऊ शकते. मोदींसमक्ष देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरील विश्वासार्हता गमावण्याचा धोका निर्माण झाला असून त्यांनी आपल्या पक्षनेत्यांना लगाम घालायला हवा, असे या अहवालात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अन्यथा मोदींची जागतिक विश्वासार्हताही धोक्यात
By admin | Published: October 30, 2015 10:10 PM