ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 27 - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग 2007 मध्ये रशियाच्या दौ-यावर असताना सुदैवाने विमान अपघातातून वाचले होते. 11 नोव्हेंबर 2007 मध्ये मनमोहन सिंग यांना रशियाला घेऊन जाणा-या एअर इंडिया वन विमानाने लँडिंगदरम्यान केलेल्या दुर्लक्षामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मॉस्को हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने प्रसंगावधान राखत वेळीच सूचना केल्याने हा अपघात टळला.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बोईंग 747 च्या वैमानिकाने लँडिंग गेअरला गरजेनुसार खाली घेतलं नव्हत. मॉस्को हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) कक्षाने आठवण करुन दिल्यानंतर विमानाची चाकं खाली आणण्यात आली. जर चाकं खाली न आणता विमानाचं लँडिंग केलं असतं तर विमानाचा अपघात झाला असता.
या विमानात पंतप्रधानांच्या सुरक्षेसंबंधी अजूनही गंभीर चुका करण्यात आल्या होत्या अशी माहिती विमानाच्या डेटा रेकॉर्डरमधून मिळाली आहे. विमान इलेक्ट्रिक ग्लाईड स्लोपच्या खाली उड्डाण करत होते असंही समोर आलं आहे. इलेक्ट्रिक ग्लाईड स्लोप हा विमानाचा रस्ता असतो. खाली उड्डाण करत असलेल्या विमानाला धावपट्टीवर व्यवस्थित उतरवण्यासाठी याचे पालन करणे गरजेचे असते. एअर इंडियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.