श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील पीडीपी पक्षाच्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गो-हत्येवरुन मुस्लिमांची होणारी हिंसा थांबवा, अन्यथा याचे वाईट परिमाण होतील, असे मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री मुझफ्फर हुसैन बेग यांनी म्हटले आहे. तसेच 1947 मध्ये अगोदरच फाळणीची एक घटना घडल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.
जम्मू आणि काश्मीरचे माजी उप-मुख्यमंत्री आणि पीडीपीचे नेते मुझफ्फर हुसैन बेग यांनी मुस्लीम समाजातील लोकांच्या हत्यांवरुन तीव्र शब्दात टीका केली आहे. तसेच मुस्लीम समाजाची हत्या करणाऱ्यांना इशाराही दिला आहे. 1947 मध्ये फाळणीची एक घटना घडल्याचे सांगताना, पुन्हा एकदा दुसरा पाकिस्तान निर्माण होईल, असेच बेग यांनी आपल्या भाषणातून सुचवले आहे. गाय आणि म्हैस यांच्या नावावरुन मुस्लीम समाजातील लोकांच्या करण्यात येणाऱ्या हत्या थांबवा, अन्यथा 1947 साली काय घडले हे माहितच आहे, असा इशाराच त्यांनी दिला आहे. सोशल मीडियावर बेग यांच्या वक्तव्याला मोठा विरोध करण्यात येत असून अनेकांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारीच उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार हरी ओम पांडे यांनीही मुस्लीमांच्या वाढत्या लोकसंख्येमुळेच देशातील खून आणि बलात्काराच्या घटना वाढल्याचे म्हटले होते. त्यावेळी त्यांनीही असेच वक्तव्य केले होते.