हरीश गुप्ता, नवी दिल्लीजो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याविरोधात जर काही ठोस कारवाई झाली नाही, तर पाकिस्तानविरोधात भारताला ‘काही कृती’ करणे भाग पडेल, असा निरोप मोदी यांनी जागतिक नेत्यांना दिल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील वॉर रूमला भेट देऊन दोन तास तेथे चर्चा केली.
भारताने संयुक्त राष्ट्रे आणि सार्क परिषदेसह विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानविरुद्ध थेट आणि अत्यंत कठोरपणे टीकास्त्र सोडले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही आघाडी उघडलेली असतानाच, भारत लष्करी कारवाईबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. असे असतानाच मुत्सद्देगिरीच्या पातळीवर भारत पाकविरुद्ध थेट आणि आक्रमकपणे मैदानात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनाही हेच अपेक्षित आहे.
इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक दिनेश्वर शर्मा यांनी दहशतवादाला पाठिंबा देणारांवर निर्बंध घालणे आवश्यक झाले आहे, असे सार्क राष्ट्रांना उद्देशून म्हटले आहे. पंतप्रधानांच्या विचारांचा परिपाक म्हणून की काय, दिनेश्वर शर्मा यांनी परिषदेत सांगितले की, १८ भारतीय सैनिकांचे बळी घेणाऱ्या उरीतील हल्ल्याबाबत भारतीयांच्या संतप्त भावना आहेत. आपला संताप व्यक्त करण्यासाठी नागरिक महिला रस्त्यावर उतरत आहेत. उरीतील हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींबाबत पाकिस्तानला जागतिक व्यासपीठावर एकाकी पाडण्यासाठी, भारताचे अनेक मंत्री शेजारी आणि मित्र देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज २६ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताची बाजू मांडत आहेत. नियंत्रणरेषेजवळ लपलेल्या अतिरेक्यांना टिपण्यासाठी भारतीय लष्कराच्या सज्जतेबाबत पंतप्रधानांनी लष्कराचे वरिष्ठ कमांडर आणि इतर ज्येष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.