नवी दिल्ली : ओटीपी आणि पासवर्ड हॅकिंगच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी मंडी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) संशोधकांनी नवी क्रांतिकारी प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली सुरक्षित प्रमाणीकरणासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी बायोमेट्रिक-आधारित वर्तन शैलीचा आधार घेईल.
‘अडॅपआयडी’ नावाची ही प्रणाली आयआयटी मंडीने ‘डीप एल्गोरिदम’च्या सहकार्याने विकसित केली आहे. या प्रणालीची संकल्पना आयआयटी मंडी व आयआयटी कानपूरची असून ती विकसित करण्यात ‘डीप एल्गोरिदम’ने पुढाकार घेतला आहे. या प्रणालीला आधीच पेटेंट मिळाले असून, सध्या एक बँक व न्यायवैद्यक कंपनी या प्रणालीचा वापर करत आहे. सरकारी योजनांच्या प्रमाणीकरणासाठी या प्रणालीचा वापर करण्यात यावा यासाठी आयआयटी मंडीची केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे.