जम्मू-काश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 24 एप्रिलला जम्मू-काश्मीर दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीआयएसएफचे डीआयजी डॉ. अनिल पांडे म्हणाले की, आमच्या 13 कंपन्या जम्मू-काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कर्तव्यावर आहेत. सीआयएसएफ आउटर कॉर्डनच्या परिसरात तैनात करण्यात आले असून शोध मोहीम सुरू आहे.
डॉ अनिल पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सीआयएसएफचे जवान चढ्ढा कॅम्पजवळ बसमध्ये चढत असताना दहशतवादी हल्ला झाला. सुंजवां भागात शोध मोहीम गुप्तचर माहितीवर आधारित होती. या भागात जैश-ए-मोहम्मदचे फिदायन दहशतवादी सक्रिय असून ते सुरक्षा दलांवर हल्ला करू शकतात, अशी माहिती मिळाली होती. सीआयएसएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले आहेत.
सकाळी सव्वा चार वाजता जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ ड्युटीवर जात असलेल्या 15 सीआयएसएफ जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. सीआयएसएफ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. तसेच, या कारवाईत सीआयएसएफचा एक एएसआय शहीद झाला. यासोबतच चार जवानही जखमी झाले आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट असल्याचा संशय सुरक्षा दलांना होता. त्यानुसार, गुरुवारी संध्याकाळपासून जम्मू पोलिसांनी लष्कर आणि निमलष्करी दलांसह शहरातील अनेक भागात शोधमोहीम राबवली. ही शोध मोहीम शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होती आणि या कारवाईदरम्यान जम्मूच्या Bhatindi भागात दहशतवाद्यांनी सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर गोळीबार सुरू केला.