शाजापूर (म.प्र.): पंतप्रधान नरेंद्र मोदी संताप आणि व्देषाने ओतप्रोत भरलेले असून त्याच मनोभूमिकेतून ते आमच्यावर सतत टीका करत असतात. पण आम्ही त्यांच्या मत्सराचे उत्तर प्रेमानेच देत राहू, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे सांगितले.येत्या १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या शाजापूर मतदारसंघातील प्रचासभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मोदींना संताप अनावर झाल्याने ते माझे वडील, आजी व आजोबांवर टीका करतात. ते मत्सर पसरवितात. मात्र मी त्यांना प्रेमालिंगन देऊन प्रेमाचा प्रसार करतो.ते म्हणाले की, मला पंतप्रधानांना सांगावेसे वाटते की, मत्सराने द्वेषावर मात करता येत नाही. मात्र प्रेमाने मत्सरावर नक्की विजय मिळविता येतो. त्यामुळे ते आमच्यावर जेवढ्या त्वेषाने टीका करतील त्याला आमच्याकडून तेवढ्याच उत्कट प्रेमाने प्रतिसाद मिळेल.राहुल गांधी असेही म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानाने लोकांवर हुकुमत गाजवायची नसते तर जनतेचे ऐकायचे असते. पण मोदी कोणाचेच काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीत. शेवटी देशाचे भाग्य जनताच घडवत असते हे मोदींना लक्षात घ्यायला हवे.राहुल गांधी पुढे असेही म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय घेतानाही मोदींनी कोणाचेही न ऐकण्याचाच खाक्या चालविला. त्यांनी एखाद्या साध्या दुकानदाराला विचारले असते तरी नोटाबंदीने काही भले होणार नाही, हे त्यानेही सांगितले असते. पण काँग्रेस पक्ष जाहीरनाम्यात ग्वाही दिलेली ‘न्याय’ योजना राबवून मोदींनी मरगळ आणलेल्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देईल, असे तेम्हणाले. (वृत्तसंस्था)
मोदींच्या संताप व द्वेषाला प्रेमालिंगन हेच आमचे उत्तर - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 05:48 IST