नवी दिल्ली: शिवसेनेसोबतचं आमचं नातं राजकारण्याच्या पलीकडचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. देश विकसित आणि सशक्त व्हावा, अशीच दोन्ही पक्षांची इच्छा असल्याचंदेखील पंतप्रधान मोदी म्हणाले. आज मुंबईत शिवसेना आणि भाजपा युतीची घोषणा झाली. यानंतर मोदींनी ट्विट करुन यावर भाष्य केलं. यामध्ये त्यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचाही उल्लेख केला. शिवसेना-भाजपाने निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एनडीएचं सामर्थ्य वाढलं आहे. या युतीला महाराष्ट्र साथ देईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. याचसोबत त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचादेखील उल्लेख केला. 'बाळासाहेब आणि अटलजी यांच्याकडून प्रेरणा घेत शिवसेना-भाजपा युती महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल. महाराष्ट्राची जनता पुन्हा एकदा विकासचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवणारे, भ्रष्टाचाराला थारा न देणारे लोकप्रतिनिधी निवडून देईल,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं.
शिवसेना-भाजपामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युतीबद्दल चर्चा सुरू होती. अखेर याबद्दलची घोषणा आज करण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. युतीच्या अंतिम चर्चेसाठी मित्रपक्षाला पटक देंगे म्हणणारे भाजपा अध्यक्ष अमित शहा आज मातोश्रीवर आले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. शिवसेना-भाजपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील जाहीर करण्यात आला. लोकसभेच्या 48 पैकी 25 जागा भाजपा लढवणार आहे. तर शिवसेना 23जागा लढवेल. तर विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवतील.