बंगळुरू- कर्नाटकातल्या सत्ता समीकरणाचा पेच दिवसेंदिवस वाढतच चाललाय. लिंगायत नेत्याला उपमुख्यमंत्री करा या वीरशैव महासभेच्या आग्रहानंतर आता मुस्लिम आमदाराला उपमुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेसकडून 7 वेळा आमदार असलेल्या रोशन बेग यांना उपमुख्यमंत्री करा, अशी मागणी मुस्लिम संघटनांनी केली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना सरकार बनवण्याचं निमंत्रण दिलं आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळातल्या उपमुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. मुस्लिम संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे.कालच लिंगायत नेत्याला उपमुख्यमंत्रिपद द्या, अशा आशयाचं पत्र अखिल भारतीय वीरशैव महासभेनं कुमारस्वामींना लिहिलं होतं. त्यामुळे नवा वादाला तोंड फुटलं असतानाच आता हिंदू महासभेच्या याचिकेमुळे कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यातील अडचणींमध्ये भर पडली आहे. बुधवारी (23 मे) रोजी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास तयार झाला असून, त्यानुसार जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे 13 मंत्री व काँग्रेसचे 20 मंत्री बुधवारी शपथ घेतील, हे निश्चित मानले जात आहे. शपथविधीनंतर आपण 24 तासांतच बहुमत सिद्ध करू, असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी 15 दिवसांचा अवधी दिला आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणे नक्की आहे. तसेच काँग्रेस फोडण्याची येडियुरप्पांची खेळी उधळून लावणारे डी. के. शिवकुमार यांचेही मंत्रिमंडळातील स्थान नक्की आहे. कुमारस्वामींच्या पक्षाकडे वित्त खाते, तर काँग्रेसकडे गृह खाते राहील, असे सध्याचे चित्र आहे. हीच दोन अतिशय महत्त्वाची खाती मानली जातात. काँग्रेसकडून अधिकाधिक लिंगायत आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा अंदाज आहे. येडियुरप्पा यांचे भविष्यातील डाव यशस्वी होऊ नयेत, यासाठीच हे केले जाईल .बसपा, एक अपक्ष व एक मुस्लीम आमदारही सरकारमध्ये असेल.