भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारताने मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान ही धाडसी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदला दणका दिला. नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करत भारतानं 12 दिवसांपूर्वी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेज खटक यांनी अतिशय मजेशीर विधान केलं आहे. भारतीय वायु सेनेने हल्ला केला तेव्हा आम्हीही प्रत्युत्तर देण्यासाठी तयार होतो. पण, रात्रीचा काळोख होता, म्हणून आम्हाला गप्प बसावे लागले असे, खटक यांनी म्हटले आहे.
भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोटच्या दहशतवादी तळावर जोरदार हल्ला चढवून दहशतवाद्यांना संपविल्याच्या वृत्तानंतर पाकिस्तानी नेते आणि अधिकाऱ्यांकडून काहीही बरळले जात आहे. त्यातच, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी एक मजेशीर वक्तव्य केलंय.तत्पूर्वी भारताने केलेल्या हल्ल्याचा दावा पाकिस्तानने फेटाळून लावत भारताच्या आक्रमणाला ‘आम्ही आमच्या पसंतीची वेळी आणि ठिकाणी’ प्रत्युत्तर देऊ असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने सुरक्षा समितीची बैठक घेतली. यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सशस्त्र दले व जनतेला कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज राहण्याचे आवाहन केले. भारताच्या आक्रमणात कोणीही मरण पावलेले नाही, असा पाकचा दावा आहे.
तर आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री परवेज खटक यांनी हसू आणणारे स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकार नायला इनायत यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, परवेज खटक यांनी हवाई हल्ला झाल्याचे मान्य केले आहे. तसेच, आम्ही भारताला प्रत्युत्तर देणार होतो, पण काळोख होता, त्यामुळे आम्हाला झालेल्या नुकसानीचा अंदाज येऊ शकला नाही, असं मजेशीर उत्तर खटक यांनी दिलंय. विशेष म्हणजे, यापुढे भारताने अशी कारवाई केल्यास आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ, असेही खटक यांनी म्हटल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनीही भारतीय विमानांना पाकिस्तानने पळवून लावल्याचा पोकळ दावा केला होता.