जैपोर (ओडिशा) : उपग्रहनाशक क्षेपणास्त्राच्या रूपाने आमच्या सरकारने आता अंतराळातही चौकीदार नेमला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. निव्वळ घोषणाबाजी न करणाऱ्या व खंबीरपणे निर्णय घेणाऱ्यांनाच निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले. ओडिशामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत.पूर्व भारतातील प्रचारमोहिमेचा प्रारंभ मोदी यांनी ओडिशातील जैपोर येथे शुक्रवारी सभा घेऊन केला. त्या वेळी ते म्हणाले की, लोकांच्या पाठिंब्याशिवाय देशात विकासकामे करणे एनडीए सरकारला शक्यच झाले नसते. ओडिशामध्ये आमच्या सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांत या राज्यांतील मतदारांनी एनडीएच्या उमेदवारांनाच निवडून द्यावे. गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने आठ लाख कुटुंबांसाठी घरे बांधून दिली, ४० लाख घरांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन दिले.मोदी म्हणाले की, उपग्रहनाशक क्षेपणास्त्र विकसित केल्याच्या यशाची विरोधक खिल्ली उडवत आहेत. अशा टीकाकारांना लोकसभा निवडणुकीत चोख उत्तर दिले जाईल. पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारताने हवाई हल्ले चढवून दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले. त्यामध्ये किती दहशतवादी मारले गेले याचे पुरावे विरोधकांकडून मागितले जात आहेत. ही मागणी करून या पक्षांनी संरक्षण दले व शास्त्रज्ञांचा अवमान केला आहे. अशा पक्षांना मत देऊ नका.
आमच्या सरकारने अंतराळातही नेमला चौकीदार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 4:30 AM