विकास झाडे
नवी दिल्ली : प्रतिकूल परिस्थिती असतानाही ‘आप’ सरकार जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध होती. आम्ही संघर्ष केला आणि पाच वर्षांत विविध योजना राबविण्यात यशस्वी झालो. दिल्लीतील सर्वच नागरिक आपच्या योजनांचे लाभार्थी ठरले आहेत. त्यामुळे दिल्लीकर पुन्हा आम आदमीचे सरकार आणेल यावर माझा विश्वास असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘लोकमत एडिटोरिअल बोर्डा’चे चेअरमन विजय दर्डा यांच्याशी चर्चा केली.
लोकसहभागामुळेच आज दिल्लीत सम-विषम यशस्वी ठरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपेक्षा आज दिल्लीतील प्रदूषण कमी झाले आहे. ज्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत त्याचे राजकारण होऊ नये. परंतु दुर्देवाने भाजप तसे वागत आहे. दिल्लीतील शेजारच्या राज्यांनी आणि केंद्र सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घेतला तर दिल्लीतील हवा जीवघेणी ठरणार नाही.आमच्या सरकारमुळे शाळांचा कायापालट झाला आहे. गरीबांची मुले पंचतारांकीत शाळेत जायला लागली. त्यामुळे लोकांना या शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गर्दी करावी लागत आहे, असा दावा करून ते म्हणाले की, दिल्लीत लोकांना पाणी मोफत मिळू लागले आहे. मोहल्ला क्लिनिकमुळे रुग्णांवर उत्तम उपचार होऊ लागले असून मोफत औषधांमुळे खर्च शून्यावर आला आहे. २०० युनिटपर्यंत वीज बिलावर शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. कोणत्याही खासगी रुग्णालयांमध्ये आकस्मिक रुग्णांवर उपचाराची जबाबदारी सरकारने उचलली आहे.
नायब राज्यपाल अनिल बैजल हे चांगले गृहस्थ आहेत. दिल्लीचा विकास व्हावा असे त्यांनाही वाटते. सुरुवातीला ते आमच्यासोबत चर्चा करायचे, मात्र त्यांचा सहभाग अचानक बंद झाला. केजरीवालांच्या कार्यक्रमात तुम्ही कसे? असे विचारणा त्यांना केंद्राकडून झाली असावी, असेही केजरीवाल म्हणाले.बंदे में है दम...विजय दर्डा यांनी केजरीवाल यांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. लोकमतचा दीपभव आणि दीपोत्सव हे अंक सप्रेम भेट दिले. याप्रसंगी केजरीवाल यांच्या नेतृत्वातील दिल्ली सरकारच्या विविध योजना आणि विकासकामांवर प्रकाशझोत टाकण्यात आलेल्या संकलित लोकमतच्या वृत्तांचे ‘बंदे में है दम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.महाराष्ट्रात सरकार लवकर स्थापन व्हावे!महाराष्ट्रातील विधानसभेचे निकाल लागून बारा दिवस ओलांडले तरीही सरकार बसायचे आहे. यावर केजरीवाल यांनी दर्डा यांच्याकडे खंत व्यक्त केली. महाराष्ट्रात विविध समस्या आहेत.शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न आहेत. लोकांनी ज्यांच्यावर विश्वास दाखविला त्यांनी सरकार न बनवता पदांसाठी भांडणे हा मतदारांचा विश्वासघात आहे. महाराष्टÑात लवकर सरकार व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.