हरिश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात दोन प्रमुख दावेदारांमध्ये विचित्र विरोधाभास पाहायला मिळत आहे. भाजपने शुक्रवारी जाहीर केलेल्या १२ कलमी संकल्प पत्रात मतदारांना मोठमोठी स्वप्ने दाखविली; परंतु आपने राष्ट्रीय मुद्दे टाळून स्थानिक समस्यांवर भर देत कचऱ्याचे ढीग साफ करणे, मोकाट कुत्रे, माकडांचा त्रास कमी करण्यासह रस्ते बांधणीच्या मुद्द्यांची चर्चा केली आहे.
भाजपकडून सहा केंद्रीय मंत्री, चार मुख्यमंत्री, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा प्रचारात उतरले आहेत. ते प्रचारात राष्ट्रीय मुद्दे मांडत आहेत. मात्र, त्यांच्या प्रचाराचा संपूर्ण रोख केजरीवाल सरकारच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश करण्यावर दिसत आहे.
दारोदारी प्रचारावर आपचा जोरकेजरीवाल गुजरातमध्ये व्यस्त असल्यामुळे आप दारोदारी जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहे. ते पुढील आठवड्यापासून दिल्लीत जोरदार प्रचार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपकडे केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्याशिवाय प्रचारासाठी मोठी नावे नाहीत, ही आपची खरी अडचण आहे.
काँग्रेसमध्ये अस्पष्टतास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रचाराबाबत काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व गंभीर दिसत नाही. प्रियांका गांधी पुढील आठवड्यात प्रचार करणार किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसची पीछेहाट झाली तर आपला मदत मिळण्याच्या शक्यतेमुळे भाजप चिंतित आहे.