संसदेचं कामकाज सुरळीत न चालू दिल्याचं म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “विरोधक नकारात्मक विचाराने काम करत आहेत. अफवा आणि खोट्या प्रचाराला ते माध्यम बनवतायत. त्यांचा देशासाठी कोणताही अजेंडा नाही. निहित स्वार्थासाठी आरोप-प्रत्यारोप करणे हे विरोधकांचे काम आहे, त्यामुळे ते संसदेत व्यत्यय आणतात आणि कोणत्याही कार्यक्रमापूर्वी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात,” असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. दरम्यान, त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. जोपर्यंत त्यांच्यासारखे नेते विरोधी पक्षात राहतील तोपर्यंत आमचं काम सोपं होईल, असंही ते म्हणाले.
“राहुल गांधींसारखा नेता जोपर्यंत विरोधी पक्षात राहिल, तोपर्यंत आमचे काम सोपे होते. ते भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार करतात असं प्रत्येक जण म्हणतो,” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. टाईम्स नाऊला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांन यावर भाष्य केलं. भारत जोडो यात्रेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, “आम्ही जेव्हा यात्रा काढली तेव्हा त्याचा एक उद्देश होता. त्याची संपूर्ण माहिती आम्ही मांडली होती. भारत जोडो यात्रेचा उद्देश काय आहे आणि याद्वारे ते देशातील जनतेला काय सांगू इच्छितात हे खुद्द राहुलजींनाच माहीत नव्हते? हा त्यांच्या पक्षाचा स्वतःचा अजेंडा आहे. पक्ष आपले काम करत आहे.”
नकारात्मकता पसरवण्याचा आरोपकाँग्रेसवर नकारात्मकता पसरवून देशातील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत काँग्रेससारख्या मोठ्या पक्षानं नकारात्मकता पसरवून देशाची प्रतिमा डागाळण्यासारख्या गोष्टी करण्यापासून दूर राहावं, असं ते म्हणाले. काँग्रेसनं हे केले नाही तर त्यांच्यासमोरही अस्तित्वाचं संकट उभं राहील, असा इशाराही त्यांनी दिला.