विधानसभा अध्यक्षपदासाठी आमचा पाठिंबा काँग्रेसला, खासदाराचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 11:29 AM2021-06-29T11:29:24+5:302021-06-29T11:29:57+5:30
शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसने केला पुनरुच्चार
व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा पाठिंबा काँग्रेसला आहे याचा पुनरुच्चार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी केला. एकदा का या पदासाठी उमेदवार निश्चित केला गेला की हा विषय वेगाने पुढे सरकू शकेल, असेही या दोन पक्षांनी सुचवले. असे असले तरी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार की सभागृहातील सदस्यांची संख्या विचारात घेता मुख्य विरोधी पक्ष भाजप सत्ताधारी आघाडीला आव्हान देण्याचे धाडस करील हे स्पष्ट झाले नाही. “ अध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराबद्दल काँग्रेसने निर्णय घेतला की तीन पक्षांचे नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील, असे मला वाटते, असे शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार अरविंद सावंत यांनी सोमवारी म्हटले. सत्तेच्या वाटपाच्या व्यवस्थेनुसार अध्यक्षपद काँग्रेसकडे दिले गेले आहे.
मुदत पूर्ण करणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थैर्याची पूर्ण खात्री आहे. ते म्हणाले होते की, “शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सहजपणे काम करीत असून ते त्याची मुदत पूर्ण करील.”