ऑनलाइन लोकमत
माधेपुरा, दि. 14 - जमिनीखाली गाडून घेत समाधीला बसलेले बाबा 15 दिवस समाधीवस्थेत होते आणि त्यानंतर ते बाहेर आले असा दावा बिहारमधल्या प्रमोदबाबांच्या अनुयायांनी केला आहे.
आज बाबा समाधीवस्थेतून बाहेर आले असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चांगली असल्याचे नमूद केले आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. अर्थात, प्रमोद बाबांना समाधी घेताना प्रशासनाच्या वतीने कुणी बघितले नव्हते असेही माधेपुराचे पोलीस सुपरिटेंडेंट विकास कुमार यांनी पीटीआयशी बोलताना स्पष्ट केले आहे.
परंतु, बाबांच्या भक्तांनी मात्र प्रमोद बाबांनी 28 फेब्रुवारी रोजी समाधी घेतली होती असा दावा केला आहे. "10 फूट लांब, 10 फूट रुंद व 15 फूट खोल असा खड्डा खोदण्यात आला. त्यामध्ये पलंगावर बसलेल्या अवस्थेत बाबांनी समाधी घेतली. हा खड्डा नंतर कापड टाकून वर मातीने बुजवण्यात आला. आणि आज 15 दिवसांनी समाधी संपवून बाबा बाहेर आले." असे बाबांच्या भक्तांनी सांगितले.
विशेष म्हणजे पोलीसांच्या सांगण्यानुसार 28 फेब्रुवारी रोजीच यासंदर्भातली माहिती मिळाली होती. त्याचदिवशी बाबांनी असं काही करू नये असा प्रयत्न करण्यात आले. परंतु भक्तांनी प्रचंड विरोध केल्यानंतर पोलीसांनी या सगळ्याचा नाद सोडून दिला असे सांगण्यात येत आहे.