ऑनलाईन लोकमत
अहमदाबाद, दि. २ - गुजरातच्या उनझा नगरपालिकेमध्ये३६ पैकी ३५ जागांवर अपक्ष निवडून आले आहेत, तर काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे. तर या ठिकाणाहून कोणीही भाजपाच्या तिकीटीवर निवडणूक लढवली नाही त्यांना इथे एकही उमेदवार मिळाला नाही.
मसाल्यासाठी प्रसिद्ध असलेला उनझामध्ये मागील निवडणूकीत भाजपाची सत्ता होती, पण हार्दिक पटेलच्या अंदोलनामुळे येथील पाटीदार समाजाने भाजपाला नाकारले, उनझा कस्बेच्या ९ नंबरच्या वार्डात ३६ पैकी ३५ जागांवर अपक्ष निवडून आले त्यामुळे आत्ता नगरपालिका कशी स्थापन होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरपालिकांमध्ये कॉंग्रेसने भाजपला मागे टाकले असून ताज्या माहितीनुसार, कॉंग्रेस एकूण १८ नगरपालिकांमध्ये आघाडीवर आहे; तर भाजपला १२ नगरपालिकांमध्येच आघाडी मिळाली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर राज्याची सूत्रे आनंदीबेन पटेल यांच्याकडे गेली. त्यानंतरच्या या पहिल्याच महत्वाच्या निवडणुका असल्याने याचे निकाल भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि हार्दिक पटेल यांच्या आरक्षणाच्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका भाजपसाठी कठीण ठरतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. राज्यातील ४२ नगरपालिकांमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व होते. ग्रामीण आणि निमशहरी भागांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपचीच सत्ता होती. मात्र, नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये गेल्यानंतर भाजपची गुजरातवरील पकड सैल झाल्याचे या निकालांवरुन दिसत आहे.