नितीन अग्रवालनवी दिल्ली : लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार दिल्याचा केंद्र सरकार दावा करत असले तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. राष्ट्रीय करिअर पोर्टलवर उपलब्ध झालेल्या ९०.४७ लाख नोकऱ्यांपैकी अवघ्या ३.५ टक्के जागांवर पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय कामगार खात्याचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत सांगितले की, पोर्टलवर ४ नोव्हेंबरपर्यंत ९०.४७ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या. त्यात ३.१६ लाख उमेदवारांना नोकरीकरिता नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावर तेली म्हणाले की, करिअर सेवा मध्ये रोजगार कार्यालयांना परस्परांशी जोडण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्रातील यवतमाळला (३०.४० लाख), उस्मानाबाद (२६.३७ लाख), ठाणे (२४.७९ लाख) अशी ८१.५६ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. इंटरलिकिंग योजनेच्या अंतर्गत ३.६० कोटी रुपये देण्यात आले. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या सप्टेंबरमध्ये १.१० कोटी होती. त्यामध्ये ६७ लाख पुरुष व ३४ लाख महिला उमेदवार होत्या. या पोर्टलवर उपलब्ध प्रत्येक नोकरीसाठी सरासरी ७५ उमेदवारांनी अर्ज केला होता. महाराष्ट्रातील ११.०६ लाख, लोकांनी नोकऱ्यांसाठी अर्ज केले होते.
मोफत नावनोंदणीराष्ट्रीय करिअर पोर्टल २०१५ साली केंद्रीय कामगार खात्यातर्फे सुरू करण्यात आले. त्या पोर्टलवर कोणालाही नोकरीसाठी मोफत नावनोंदणी करता येते. त्यामुळेही या पोर्टलला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र या पोर्टलव्दारे लोकांना नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण कमी आहे.