नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेच्या मालकी हक्कासंबंधीच्या अपिलांच्या सुनावणीत मूळ पक्षकारांखेरीज अन्य कोणाही त्रयस्थ पक्षाला सहभागी होऊ न देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ठरविले. पुढील सुनावणी २३ मार्चला होईल.अलाहाबाद उच्च न्यायालयाने सन २०१० मध्ये दिलेल्या निकालाने या अडीच एकर वादग्रस्त जागेची सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा व खुद्द भगवान राम लल्ला यांच्यात वाटणी केली होती. याविरुद्ध केल्या गेलेल्या १६ अपिलांची अंतिम सुनावणी सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे.मूळ पक्षकार नसलेल्या भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह अनेक त्रयस्थांनी या सुनावणीत सहभागी होण्यासाठी अर्ज केले होते. या सर्वांना अनुमती नाकारली. मात्र वादग्रस्त रामजन्मभूमीवर जाऊन प्रभू रामचंद्रांची पूजाअर्चा करणे हा आपला मूलभूत हक्क मालकीच्या वादाहून वरचढ असून त्याचे पालन करता यावे, यासाठी डॉ. स्वामी यांनी एक वेगळी याचिका केली आहे. तिची सुनावणी स्वतंत्रपणे होईल.
अयोध्या खटल्यातून सर्व त्रयस्थ पक्ष बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 4:21 AM