मोदींची नक्कल करणं पडलं महागात, कॉमेडियन श्याम रंगीला शोमधून आऊट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 03:53 PM2017-10-27T15:53:29+5:302017-10-27T15:58:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करणं एका कॉमेडियनला चांगलंच महागात पडलं आहे.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करणं एका कॉमेडियनला चांगलंच महागात पडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्यामुळे कॉमेडियन श्याम रंगीलाला ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. विशेष म्हणजे एपिसोडमध्ये त्याने केलेली मोदींची मिमिक्री ऑन एअर दाखवली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याआधी श्याम रंगाली यांने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही मिमिक्री केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल करता येणार नाही, तुला शोसाठी नवीन कंटेंट तयार करावा लागेल, असं श्यामला सांगण्यात आलं. कंटेंट तयार करण्यासाठी त्याला फारसा वेळही देण्यात आला नाही. पर्यायाने त्याचं एलिमिनेशन करण्यात आलं.
या प्रकारामुळे 22 वर्षांचा श्याम रंगाली यांने कार्यक्रमाच्या टीमवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘मी मोदींची नक्कल करण्यात माहीर असल्याचं त्यांना माहित होतं. मग शोमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रणच का दिलं? असा सवाल श्यामने उपस्थित केला आहे.
'मोदींची नक्कल करता येणार नाही, हे त्यांनी आधी सांगितलं होतं. सुरुवातीला राहुल गांधींची मिमिक्री केल्यावर कुणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. त्याबद्दल तेव्हा कुणालाही हरकत नव्हती. पण अचानक त्यांनी राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी यापैकी कोणाचीही मिमिक्री करता येणार नाही, असं सांगितलं. मी पंतप्रधानांना शिव्या तर घातल्या नव्हत्या. मी फक्त मिमिक्री केली. त्यात काय वेगळं?’ असा सवाल श्यामने उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर राजकीय नेत्यांची मिमिक्री करण्यामुळे श्याम रंगीला प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याला द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये बोलविण्यात आलं.
श्याम रंगीला कोण आहे?
श्याम रंगीला हा राजस्थानचा रहिवासी आहे. राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यातल्या रायसिंहनगरमधील मोहकमवाला गावात लहानाचा मोठा झाला. 2004 मध्ये शाळेतूनच त्याने मिमिक्रीला सुरुवात केली. लहानपणापासूनच त्याला कॉमेडियन होण्याची इच्छा होती. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्याने मिमिक्री करणं सुरु केलं.
सुनील पालने केलं समर्थन
प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी श्याम रंगीलाची समर्थन केलं आहे. नेत्यांची मिमिक्री करण्यात काहीच हरकत नाही, फक्त तो निखळ विनोद असायला हवा, असं सुनील पाल यांनी म्हंटलं. ‘मी नाना पाटेकर, इरफान खान यासारख्या अनेक अभिनेत्यांची मिमिक्री केली आहे, पण कोणी कधीच आक्षेप घेतला नाही.’ असं सुनील पाल यांनी सांगितलं.