लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘२०१४ हे वर्ष केवळ तारीख नसून बदल आहे. लोकांनी तत्कालीन ‘आऊटडेटेड’ सरकारला जुन्या स्क्रीन असलेल्या फोनप्रमाणे नाकारले आणि आमच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला संधी दिली,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केली.
येथे ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’ मधील आपल्या भाषणातील आकडेवारीचा हवाला देत मोदी यांनी भारत मोबाइल फोनचा आयातदार असताना निर्यातदार कसा बनला आणि ॲपलपासून गुगलपर्यंतच्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या देशात उत्पादन बनण्यास कशा तयार आहेत, याची माहिती दिली.
मोदी म्हणाले, “वर्ष २०१४ मध्ये, आमच्याकडे... मी २०१४ का म्हणतोय... ती तारीख नाही, तर बदल आहे. २०१४ पूर्वी भारतात काही शेकड्यांत स्टार्टअप होते पण आता ही संख्या एक लाखाच्या आसपास पोहोचली आहे.
जग आता ‘मेड इन इंडिया’ फोन वापरतेय
सर्वात वेगवान ५ जी मोबाइल टेलिफोन नेटवर्क लाँच केल्यानंतर, भारत ६ जी क्षेत्रात एक आघाडीचा देश म्हणून प्रस्थापित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जग आता ‘मेड इन इंडिया’ फोन वापरत आहेत, असेही मोदी म्हणाले. मोबाइल ब्रॉडबँड गतीच्या बाबतीत भारत ११८ व्या स्थानावरून ४३ व्या स्थानावर गेला आहे असा उल्लेखही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला.
बॅटरी चार्ज करून किंवा बदलूनही उपयोग नव्हता...
२०१४ पूर्वीच्या दिवसांची आठवण करून देताना मोदी म्हणाले की, त्यावेळी ‘आऊटडेटेड फोन’ची स्क्रीन वेळोवेळी हँग व्हायची. तुम्ही कितीही स्क्रीन स्वाइप केली किंवा कितीही बटणे दाबली तरी काहीही परिणाम होत नव्हता... आणि त्यावेळच्या सरकारचीही अशीच परिस्थिती होती. त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था किंवा तत्कालीन सरकारचीच म्हणायला हवे, परिस्थिती इतकी बिकट होती की, पुन्हा सुरू करूनही फायदा झाला नाही. बॅटरी चार्ज करून किंवा बदलूनही उपयोग नव्हता. त्यामुळे २०१४ मध्ये लोकांनी असे कालबाह्य ‘फोन’ सोडून दिले आणि आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. या बदलामुळे काय झाले तेही स्पष्टपणे दिसून येत आहे.