चंदीगढ : पुढील वर्षाच्या सुरुवातीस होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मतदानयंत्रांमध्ये गडबड केली जाण्याची कोणतीही शक्यता राहू नये. यासाठी बाहेरच्या राज्यांमधून आणलेली मतदानयंत्रे वापरण्यात येणार आहेत.पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. के. सिंग यांनी सांगितले की, राज्यातील एकही मतदानयंत्र आगामी निवडणुकीसाठी वापरले जाणार नाही. लागणारी सुमारे ३५ हजार मतदानयंत्रे जम्मू-काश्मीर, बिहार, झारखंड व कर्नाटक आदी बाहेरच्या राज्यांमधून आणली जातील. या सर्व यंत्रांमध्ये नोंदलेल्या मताची लेखी पोचपावती मतदाराला देण्याचीही सोय असेल.सर्व राजकीय पक्षांनी आपापले प्रतिनिधी पाठवून या यंत्रांमध्ये कोणतीही गडबड नाही, याची स्वत: खात्री करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात परराज्यांतून मतदानयंत्रे आणली जावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरेंद्र सिंग यांनी निवडणूक आयोगास पत्र पाठवून केली होती. (वृत्तसंस्था)
पंजाब निवडणुकीसाठी बाहेरची मतयंंत्रे
By admin | Published: September 27, 2016 1:44 AM