अलीगढ : येथील मुकेश कचोरी या दुकानात सकाळपासून रात्री उशीरापर्यंत ग्राहकांची रांग लागलेली असते. मात्र, हा कचोरीवाला एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. मुकेशला कर विभागाने नोटीस पाठविली आहे. कारण त्याचे वार्षिक उत्पन्न 60 लाख रुपये ते 1 कोटी रुपये गृहीत धरण्यात आले आहे. मुकेशने ना ही जीएसटीसाठी नोंदणी केली आहे ना ही कधी कर भरला आहे. 12 वर्षांपासून मुकेश हे दुकान चालवत आहे.
मुकेश गेल्या काही वर्षांपासून कचोरी, समोसे विकत आहे. मात्र, नुकतीच कोणीतरी कर विभागाला त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर कर निरिक्षकांनी त्याच्या दुकानात बसून मुकेशच्या विक्रीवर नजर ठेवली होती. यावेळी ते संशय येऊ नये म्हणून समोसे, कचोरीही खात होते.
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयबीच्या सदस्याने सांगितले की, मुकेशने त्याचे उत्पन्न आणि सर्व खर्चाचे विवरण दिले आहे. त्याला जीएसटीअंतर्गत नोंदणी करावी लागणार आहे आणि एका वर्षाचा करही भरावा लागणार आहे. 40 लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्यांना जीएसटीसाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. तयार अन्नावर 5 टक्के जीएसटी लागतो.
दुसरीकडे मुकेशने हा आरोप नाकारला आहे. माझ्या दुकानावर 20 जुलैला छापा टाकण्यात आला. माझा दिवसाचा गल्ला 2 ते 3 हजार रुपये आहे. मोदींनी सांगितल्यानुसार 40 लाखांवर उलाढाल असेल तर जीएसटी नोंदणी करावी लागते. माझे उत्पन्न तर याच्या निम्मेही नाही, हे लोक मला त्रास देत आहेत, असा आरोप केला आहे.