कटनी : सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी लोक नाना तऱ्हेचे उद्योग करत असतात. रिल बनविण्यासाठी एका युवकाने राष्ट्रीय पक्षी मोराचे हाल केले. या मोराची सर्व पिसे काढतानाचा एक व्हिडीओ चित्रित करून ते रील सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी वनखात्याने अज्ञात युवकावर गुन्हा नोंदविला आहे. या युवकाबरोबर आणखी एक युवक, युवती या व्हिडीओत दिसतात.
मोराचा छळ केल्याची घटना मध्य प्रदेशमधील कटनी येथे घडली आहे. या रीलमध्ये एक युवक मोराच्या अंगावरील सर्व पिसे काढून टाकताना दिसतो. त्याच्यावर मोराचा छळ केल्याप्रकरणी वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. तो रिठी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडीओत जी बाइक दिसते तिच्या मालकाचाही ठावठिकाणा मिळाला आहे.
(वृत्तसंस्था)
अटक होणारगुजरातमधील एका स्वयंसेवी संस्थेने हा व्हिडीओ मध्य प्रदेश वनाधिकाऱ्यांना पाठविला होता. मोराची पिसे काढणाऱ्या युवकाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केला होता. या युवकाचा ठावठिकाणा शोधून पोलिस त्याला लवकरच ताब्यात घेतील, असे वनखात्याने सांगितले.