उत्तर प्रदेश - भरधाव जात असलेल्या राजधानी एक्स्प्रेसमधून टीटीईने भारतीय लष्करातील एका जवानाला धक्का देऊन बाहेर ढकलल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. टीसीने दिलेल्या धक्क्यामुळे बाहेर पडलेल्या जवानाचे दोन्ही पाय कापले गेले असून, तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे बरेली रेल्वे जंक्शनवर मोठा गोंधळ झाला. जखमी जवानाच्या सहकाऱ्यांनी आक्रमक होत ट्रेन थांबवली. त्यानंतर जखमी जवानाला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही घटना बरेली जंक्शनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक २वर घडली. येथे देशाचं रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या एका जवानाला टीटीईच्या गुंडगिरीमुळे दोन्ही पाय गमवावे लागले. राजधानी एक्स्प्रेसमध्ये जवान आणि टीटीईमध्ये तिकीटावरून वाद झाला. त्यावेळी टीटीईने रागाच्या भारात जवानाला धक्का दिला आणि बाहेर ढकलले. दरम्यान, ट्रेनखाली आल्याने या जवानाचे दोन्ही पाय कापले गेले. या घटनेनंतर स्टेशनवर गोंधळ झाला. तसेच सहकारी जवानांनी ट्रेन रोखून धरली.
टीटीईच्या या कृत्यामुळे संतापलेल्या जवानांनी या टीटीईला बेदम मारहाण केली. पण तो घटनास्थळावरून फरार झाला. ही राजधानी एक्स्प्रेस डिब्रुगडवरून दिल्लीकडे जात होती. त्यादरम्यान, बरेली जंक्शनजवळ टीटीई आणि जवानामध्ये तिकिटावरून वाद झाला. दरम्यान, जीआरपी आणि आरपीएफने जखमी जवानाला रुग्णालयात दाखल केले. तसेच गुन्हा दाखल करून टीटीईचा शोध सुरू केला आहे.