ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 23- जम्मू-काश्मीरमध्ये जमावानं मशिदीबाहेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करून या हत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मोहम्मद आयुब पंडित असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. ते नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात होते.
रमजानच्या महिन्यातील शेवटचा शुक्रवार लक्षात घेता मशिदीबाहेरच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. तिथे कोणताही अनुचित प्रकार घडायला नको यासाठी पोलिसही गस्त घालत होते. यावेळी जामिया मशिदमध्ये "शब-ए-कद्र"ची प्रार्थना सुरू होती. रमजानमधील नमाज पठण असल्यानं खबरदारी म्हणून मशिदींबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. . तिथे पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडितही तैनात होते. ते मशिदीचा फोटो काढत असल्याचा जमावाचा गैरसमज झाला. काही वेळ गोंधळ उडाला. पोलीस अधिकाऱ्यानं हवेत गोळीबार केला. त्यात ३ लोक जखमी झाले. त्यानंतर जमावाने पोलीस उपअधीक्षक पंडित यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Deputy SP Mohammed Ayub Pandith of Security beaten to death by mob in J&K"s Nowhatta last night pic.twitter.com/TGIfIQIsFx— ANI (@ANI_news) June 23, 2017