नवी दिल्ली - राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर आभाराचे भाषण केले. यावेळी, भाषणाला अनुसरून विविध मुद्यांवर अभ्यासपूर्ण भाषण केले. कोल्हे यांनी कोरोना, संसदेची नवीन इमारत ते दिल्लीच्या सीमारेषेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनापर्यंत सर्वच मुद्दे आपल्या भाषणात घेतले. विशेष म्हणजे, मोदींनी दिलेल्या आंदोलनजीवी या शब्दावरुन त्यांनी भाजपाला खोचक टोला लगावला. कोल्हेंचं भाषण सोशल मीडियावर चर्चेचं ठरलं. तर, सुप्रिया सुळेंनीही त्यांच्या भाषणाचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावपर आभार प्रदर्शनाचे भाषण करताना विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरही मोदींनी आपलं मत मांडलं. शेतकरी आंदोलनामध्ये काही आंदोलनजीवी लोक घुसले आहेत, आंदोलनजीवी नावाची नवीन जमातच अस्तित्वात आल्याचं मोदींनी म्हटलं. त्यावरुन, मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सोशल मीडियात मोदींनी ट्रोलही करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही संसदेत आभाराचे भाषण करताना, शेतकरी आंदोनावर भाष्य केले. यावेळी, आंदोलक शेतकऱ्यांचा उल्लेख करताना भारतीय असा मुद्दामूनच करत असल्याचं त्यांनी म्हटलं. कोल्हेंच्या या भाषणाचं खासदार सुप्रिया सुळे यांनी आऊटस्टँडींग स्पीच असे म्हणत कौतुक केलंय. तर, या भाषणानंतर दिल्ली दरबारी पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांचीही भेट अमोल कोल्हेंनी घेतली. यावेळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम हेही उपस्थित होते.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणात शेतकऱ्यांसाठीच्या योजनांबद्दल बोलण्यात आले. परंतु, गेली तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत शहीद झालेल्या २०० भारतीयांचा,हो मी त्यांना जाणीवपूर्वक भारतीयच म्हणतोय, त्यांचा उल्लेख देखील नसावा, त्यांच्याप्रती किंचितही संवेदना या अभिभाषणात नमूद नसावी ही आश्चर्यजनक बाब आहे. प्रजासत्ताक दिनी जी घटना घडली त्याचा निषेध करण्यात आला. हिंसेचे कसलेही समर्थन होऊ शकत नाही ना केले जाऊ शकते. परंतु या माध्यमातून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा जो कट रचण्यात आला तो अतिशय निषेधार्ह आहे, अशी टीका केंद्र सरकारवर केली.
पोरगं सियाचीनमध्ये तैनात अन् बाप आंदोलनात
आंदोलनातील शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटल्यावरुनही त्यांनी सरकारल सुनावलं. अगोदर सांगण्यात आलं की हे पंजाबचे शेतकरी आहेत, नंतर सांगण्यात आलं की ते आडते आहेत, नंतर सांगण्यात आलं की ते खलिस्तानी आहेत.त्यानंतर तथाकथित आयटी सेल आणि मिडियातील काहींनी त्यांना देशद्रोही घोषीत करुन टाकले. पण, जो बाप आपल्या अठरा वर्षांच्या मुलाला सांगतो की उठ,तुला लष्करात भरती व्हायचंय,जी आई आपल्या मुलाला सांगते की जर देशावर शत्रुची गोळी आली तर तुला तुझी छाती पुढे करायची आहे, तर हा असा बाप,आई देशद्रोही कसे असू शकतात. मुलगा आज उणे अंश सेल्सिअस तापमानात सियाचीनमध्ये कर्तव्यावर आहे,त्याचवेळी त्याचा ७० वर्षांचा म्हातारा बाप कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमांवर आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करतोय. या अशा परिस्थितीत 'जय जवान,जय किसान' कसं म्हणायचं?, असा प्रश्नही कोल्हेंनी सरकारला विचारला आहे.
आंदोलनजीवीवरुन भाजपाला चिमटा
देशाला आजतर दोन नवे शब्द मिळाले आहेत, त्यातला एक आहे आंदोलनजीवी. मी या शब्दाबद्दल अतिशय आभारी आहे.कारण महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उठसूठ आंदोलन करीत होते,त्यांना काय म्हणायचं हे आम्हाला या शब्दामुळे समजलं. पण, ज्या कष्टकरी वर्गासाठी बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही ठामपणे उभे राहतात, ते मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहेत. ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे, त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो.