नवी दिल्ली: दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार करण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या नापाक कारवायांविरोधात भारतीय लष्कराने धडक मोहीम हाती घेत दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत पाकिस्तानचे सैनिक आणि अनेक अधिक दहशतवादी ठार झाले. मात्र, भारतीय जवानांनी केलेली सडेतोड कारवाई पाकिस्तान फेटाळण्याचा प्रयत्न करत आहे.
सीमेवरील पाकव्याप्त काश्मीरमधील तांगधर भागात जवळपास 100 हून अधिक दहशतवादी भारतात घुसखोरी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. तसेच, पाकव्याप्त काश्मीरमधील तांगधर सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी तळ ठोकले होते, ज्यामध्ये 15-20 दहशतवादी होते. या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करावी, यासाठी गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानी सैनिकांकडून सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत होते. मात्र, या दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला.
पाकिस्तानकडून गेल्या शनिवारी रात्री उशिरा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात येत होता. यावेळी पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये लष्करी चौक्या आणि गावांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तांगधर सेक्टरमध्ये तैनात असलेले दोन जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला.
भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सीमेपलिकडील दहशवाद्यांची तळं उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे 6 ते 10 सैनिक मारले गेले आहेत. त्याशिवाय, अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अथमुकम, जुरा आणि कुंदलशाहीमधील दहशतवाद्यांच्या तळांवर आम्ही हल्ला चढवला. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही ही कारवाई केल्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी यावेळी सांगितले.