नवी दिल्ली : भारताने दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. पाकिस्तानकडे फक्त दहशतवाद हेच शस्त्र आहे. त्यामुळे पाकिस्तानचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितले आहे.
जम्मू-काश्मीरमधील जनता केंद्र सरकारच्या निर्णयासोबत आहे. येणाऱ्या काळात राज्यात नव्या संधी निर्माण होतील. राइट टू एज्युकेशन, राइट टू प्रॉपर्टी यांसारखे 106 कायदे, जे कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरमध्ये लागू होत नव्हते. कलम 370 विशेष दर्जा नव्हे तर भेदभाव होता. काश्मीरमधील सध्या परिस्थिती वेगाने सुधारत आहे. सध्याच्या स्थितीत काश्मीरी नागरिक एखाद्या ठिकाणी एकत्र आले, तर त्याचा फायदा दहशतवाद्यांना होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणामुळे काही निर्णय घेण्यात आले असल्याचे अजित डोवाल यांनी सांगितले.
सीमेपलीकडून दहशतवादी कारवायांचे निर्देश देण्यात आले आहेत. सीमेपासून 20 किलोमीटरवर पाकिस्तानचे कम्युनिकेशन टॉवर आहेत. त्यांच्या संवादातून महत्वाची माहिती मिळाली आहे. तसेच, पाकिस्तानमध्ये 230 दहशतवादी सक्रिय आहेत. त्यातील काही जणांना अटक करण्यात आली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे अजित डोवाल यांनी सांगितले. याचबरोबर, अजित डोवाल यांनी सोपोरमध्ये जखमी झालेल्या अडीच वर्षांच्या मुलीला एम्समध्ये घेऊन जाण्याचे निर्देश दिले आहेत.