धर्मशाला (हिमाचल प्रदेश) - कांगरा जिल्ह्यातील महाराणा प्रताप सागर सरोवरात (पोंग सरोवर नावाने प्रसिद्ध) ५० हजारांपेक्षा जास्त स्थलांतरित पक्षी आल्याचे वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले. या पक्ष्यांची मोजणी दर पंधरा दिवसांनी, तर वार्षिक मोजणी २९ आणि ३० जानेवारी रोजी केली जाते.२९ व ३० जानेवारी रोजी सरोवरात सर्वात जास्त पक्षी असतात, असे मानले जाते, असे हा अधिकारी म्हणाला. कांगरा जिल्ह्यात सिवालिक हिल्सच्या पाणथळ भागात व्यास नदीवर हे सरोवर (पोंग धरण) १९७५ मध्ये मातीचे थर वापरून बांधण्यात आले आहे. गेल्या आॅक्टोबर महिन्यातच सुमारे ५५ हजार स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. हा सरोवर वन्यजीव अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे आणि रामसर परिषदेने भारतात ज्या २७ आंतरराष्ट्रीय पाणथळ जागा जाहीर केल्या आहेत त्यात पोंग सरोवराचा समावेश आहे.येथे आॅक्टोबरमध्येच पक्षी यायला सुरुवात होते व त्यांचा परतीचा प्रवास एप्रिलमध्ये सुरू होतो. यातील बहुसंख्य पक्षी हे सायबेरिया, मध्य आशिया आणि रशियातील असतात. येथे शेकडो पक्ष्यांच्या प्रजाती असल्या तरी बार हेडेड गीझ (मोठ्या आकाराच्या बदकासारखा लांब मानेचा पक्षी) मुबलक प्रमाणात असल्याचे अधिका-याने सांगितले. या स्थलांतरित पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आम्ही पुरेशा संख्येत कर्मचारी वर्ग नेमला आहे. वन संरक्षकांच्या साह्यासाठी शिकारविरोधी तुकडीही दिली आहे.हा अधिकारी म्हणाला की, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सरोवर परिसरात बेकायदा पिके घेणाऱ्यांना रोखण्यासाठी विशेष कर्मचारी नेमण्यात आला आहे. आम्ही आमच्या सुखनादा कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवलेआहेत. (वृत्तसंस्था)२४ हजार ५२९हेक्टर्सवर हा सरोवर पसरला असून, त्याचा पाणथळीचा भाग १५ हजार ६६२ हेक्टर्स आहे.२०१७-२०१८ वर्षात१.२७ लाख पक्ष्यांनी भेट दिली होती. गेल्या वर्षी या सरोवरात १.१० लाख पक्षी आले होते.
पोंग सरोवरात ५० हजारांपेक्षा जास्त स्थलांतरित पक्षी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 3:03 AM