श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील 400 हून अधिक नेत्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत.
काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी राज्यातील 900 हून अधिक नेत्यांची सुरक्षा हटविली होती. तसेच, याप्रकरणी राज्यातील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सुरक्षा हटवण्यात आल्यामुळे प्रमुख नेत्यांचा जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असे तक्रारीत म्हटले होते.
दरम्यान, राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, राज्यातील योग्य नेत्यांना सुरक्षा लवकरात पुरवण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या एक वर्षापासून राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे. राज्यात 11 एप्रिल ते 6 मे पर्यंत पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे.
पुलवामा येथील दहशतवादी हल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. यावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. शनिवारी श्रीनगरमध्ये एक उच्च स्तरीय बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षतेवर चर्चा करण्यात आली. यात नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला.