तिरुअनंतपुरम : विदेशात नोकरी- व्यवसायासाठी गेलेल्या केरळच्या मूळ रहिवाशांपैकी ५ लाखांहून अधिक लोकांनी भारतात पुन्हा येण्याची तयारी दर्शविली आहे. ‘कोविड-१९’चा जोर कमी होऊन विमानसेवेला प्रारंभहोताच, भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी नाव नोंदणी करावी म्हणून केरळ सरकारने वेबसाईट सुरू केल्यानंतर अवघ्या बारा तासांतच हा प्रतिसाद लाभला आहे.भारतात परत येऊ इच्छिणाऱ्यांमध्ये मध्य पूर्वेतील देशांत राहणाºया केरळी नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही संयुक्त अरब अमिरातीतील केरळींची संख्या लक्षणीय आहे. केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेनंतर केरळ सरकारने अशा लोकांच्या नावनोंदणीसाठी वेबसाईट सुरू केली.विविध राज्यांतील नागरिक विदेशांत नोकरी, व्यवसायासाठी गेले आहेत. त्यातील किती लोक परत येऊ इच्छितात याची माहिती घ्यावी, असा आदेश केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना दिला होता. यासंदर्भात केरळने सुरू केलेल्या प्रयत्नांची कॅबिनेट सचिवांनी प्रशंसा केली व केरळचे अनुकरण अन्य राज्यांनी करावे, असे नमूद केले.केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, विमानसेवा पुन्हा सुरू होताच विदेशातून केरळी नागरिक राज्यात परत येऊ लागले की, त्यांच्यापैकी ज्यांना ‘कोविड’सदृश लक्षणे जाणवत असतील त्यांना रुग्णालयात क्वारंटाइन केले जाईल. ज्यांना ही लक्षणे जाणवत नाहीत त्यांना घरीच क्वारंटाइन ठेवण्यात येईल. केरळमधील विविध होस्टेल, हॉटेल, खासगी रुग्णालये तसेच हाऊसबोटमध्ये क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात येणार आहे.>२५ लाख केरळीविदेशात स्थलांतरितकेरळमधून सुमारे पंचवीस लाख नागरिक विदेशात नोकरी-व्यवसायासाठी गेले आहेत. त्यातील ९० टक्के लोक हे मध्य पूर्वेतील देशांमध्ये आहेत. लोक विमानसेवा सुरू होताच त्यांच्यापैकी भारतात परत येणाºयांचे प्रमाण लक्षणीय असेल. आतापर्यंत ५लाखांहून अधिक लोकांनी केरळ सरकारच्या वेबसाईटवर आपली नावे नोंदविली आहेत.
भारतात परतण्यासाठी ५ लाखांवर केरळी नागरिकांनी केली नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 3:42 AM